सोमवार, २० डिसेंबर, २०१०

घबाड : धारावाहिक राजकीय कादंबरी
प्रकरण:१
"नुसत्या ध्येयवादावर राजकारण चालत नसतं. त्याला पदोपदी प्रचंड पैसा लागतो. किडूक मिडूक खायचे दिवस आता गेलेत. आता एकच हात मारला की मोठ्ठं घबाड हाताला लागायला पाहिजे. ह्यावर ज्यांचा विश्वास असेल अशांनीच राजकारणात यावं. आणि दुसरं म्हणजे जे काही होतय त्याला न घाबरता अशा प्रसंगातूनच घबाड बघायला शिकावं लागतं." असा धीरोदात्त सल्ला देत प्रोफेसर रामुलू ह्यांनी पूर्व मंत्री एम.प्रजाला बसते केले. प्रजा घाबरून जावेत हे साहजिकच होतं. त्यांना पंतप्रधानांनी राजीनामा द्यायला लावलं होतं. आणि आता काय करावं ह्या विवंचनेत ते रामुलू ह्यांच्या केबिनमध्ये वाट पहात बसले होते.
रामुलू काही राजकारणी नाहीत, ह्यांना धंद्याबिंद्यातलेही काही माहीत नसावे. पण ह्यांच्याकडेच आपल्याला मुख्यमंत्र्यांनी पाठविले म्हणजे त्यात काही तरी गोम असणार. खैर आता ऐकण्याशिवाय गत्यंतर नाही हे पाहून प्रजा जरा कॉफी घेत घेत विचार करू लागले. त्यांना वाटू लागले, उगाच आपल्याला राजिनामा द्यायला लावला. चौकशी होऊ द्यायची होती. तोपर्यंत इकडचे तिकडे पाठवता आले असते. आता मंत्रीच नाही राहिलो तर सरकारी बाबू तर मदतच काय भेटणारही नाहीत. जे काही करायचे ते सीए किंवा वकीलामार्फतच करावे लागणार. बघू यात आता हे प्रोफेसर काय सांगताहेत ते.
प्रोफेसरांनी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या डायरीत मलेशिया, ब्रुसेल्स, केमेन आयलॅंड, स्वित्झरलॅंड अशी पाने करून त्यात प्रत्येक पानावर चारपाच आद्याक्षरं लिहून ठेवली होती, त्याच्या पुढचे आता प्रोफेसरांना विचारावे असे प्रजा ठरवत होते, तोच प्रोफेसर रामुलू धीर देत म्हणाले " काही काळजी करू नका. आता तुम्हाला काहीही करायचे नाहीय. जे काही करायचे ते आता सर्व वरूनच होईल. तुम्ही फक्त आता मूग गिळून गप्प बसण्याची सवय करून घ्या ! "
एम.प्रजाला काळजी पडली होती की सर्व धागेदोरे गाठी मारत जुळत आले होते. लायसेन्सेस देऊन झालीच होती. त्यावरचे कर्जाचे कागदही बाबूंनी सही करून बॅंकांना दिले होते. बॅंकांनी त्यातले कोणाला किती द्यायचे ते वरून आलेल्या यादीवरून नक्की केलेले असणार. आता त्या त्या पार्टीजनी तिथे जाऊन एकदा परवलीचा शब्द दिला की त्या त्या खात्यात सर्व अकरा-आकडी रकमा जाम होत जमा होणार. मग काय, पाहिजे तशा काढून घेता येतील. पण परवलीचा शब्द ठरवायच्या आधीच आपल्याला काढून टाकले. आता सगळ्यांचीच गोची होणार. कारण परवलीच्या शब्दांची म्हणे एक माळ तयार केलेली होती. त्यातली एकही कडी जर तुटली तर कोणालाच काही मिळणार नाही. आपल्याला तर आपला परवलीचा शब्दही माहीत नाही. मंत्रीपदही गेले. त्यात पुन्हा पकडले तर तुरुंगात ईडली-डोसा तरी देतील की नाही, कोण जाणे ?
आपल्याला एवढे टेंशन आले आहे आणि हे रामुलू बघा कसे शांत बसले आहेत. जसे एखाद्या परिक्षेत विद्यार्थी पेपर घामाघून होऊन लिहीत आहेत व समोर पंख्याखाली हे प्रोफेसर डोळा जडावत सुपारी खात बसले आहेत. आता ह्यांना बोलणार तरी काय ? ही चलबिचल ओळखून रामुलूच सांगू लागले, "आता आपण काही करायचे नाही. ठरल्याप्रमाणे सीबीआय तुम्हाला चौकशीसाठी आत टाकतील, डायरीतील पाने पाहून खरे खोटे करायला, केमेन आयलँड, ब्रुसेल्स, आणि स्वित्झरलॅंडला घेऊन जातील. तुम्ही फक्त तिथे गेल्यावर मॅनेजरला वेगळे घेऊन जायचे व परवलीचा शब्द विचारल्यावर ....." तेव्हढ्यात रामुलूंचा फोन खणखणला. पलीकडून कोणीतरी काही तरी सांगत होते व नोटस काढल्यासारखे रामुलू पॅडवर पेन्सिलीने लिहून घेत होते. पॅड पुढ्यात घेत त्यांनी त्यावर लिहिले : इंप ! म्हणजे परिक्षेत येणारा महत्वाचा सवाल "इंप, आयएमपी". मग कागद चुरगाळून फाडून टाकत म्हणाले, "एकदाच सांगतो, लक्षात ठेवा....तुमचा परवलीचा शब्द आहे....नेहमी प्रजेचाच विजय होतो व प्रजा हेच घबाड आहे....ह्यात एका काना मात्रेचाही फरक झाला तर सगळे घबाड गमावून बसाल !" एम.प्रजा समोर अकरा-आकड्यातली शून्ये तरळू लागली !